ज्ञानाच्या दृष्टीकोनातून

30
2014
Nov
दिल्ली
  

(श्री श्री रविशंकर यांनी आर्ट ऑफ लिविंगच्या प्रेरणा या 
कर्करोग विशेषज्ञच्या आणि सार्क फेडरशनच्या सहकार्याने 
चालणाऱ्या उपक्रमाचे उद्घाटन केले. प्रेरणा हा कर्करोगी रुग्णांसाठी 
चालवलेला विशेष उपक्रम आहे. खाली श्री श्री यांनी या प्रसंगी 
दिलेल्या भाषणाचा वृतांत)

इथे या प्रसंगी तुम्हा डॉक्टरां बरोबर खूप चांगले वाटत आहे. तुम्ही 
सगळे इतके चांगले काम करत आहात, चांगली काळजी घेत आहात. 
तुमच्यापैकी अनेक जण रुग्णांची चांगली काळजी घेत आहात, पण 
तुम्हाला तुमची स्वतःची सुद्धा काळजी घ्यायला हवी. 
मला खूप आनंद होत आहे कि तुम्ही सगळे प्रेरणा शी जोडले गेले 
आहात. रुग्ण बरा व्हायचा असेल तर जीवनशैली बदलावीच लागेल.
जर तुम्ही जीवनाकडे ज्ञानाच्या नजरेतून बघितले तर सर्व नकारात्मक 
भावना गळून पडतील आणि तुम्ही अगदी अंतरांगापासून आनंदी व्हाल.    
मी अलीकडेच अमेरिकन मानसोपचार मंडळाचा एक लेख वाचला ज्यात 
असे म्हंटले होते कि तुम्ही ८ आठवडे जर ध्यान केले तर तुमच्या 
मेंदूची घडण सकारात्मकपणे बदलते. जर ८ आठवड्याच्या ध्यानाने 
इतका मोठा बदल होत असेल तर समाजासाठी आशेला वाव आहे.
अजून एका संशोधनानुसार माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाटणाऱ्या 
चिंता/काळजीची पातळी १९५० साली असणाऱ्या मनोरुग्णा इतकी झाली 
आहे, हे फार चिंताजनक आहे. 
आज लोकांमध्ये खूप तणाव आणि चिंता आहे. एक २० वर्षाचा युवक 
येऊन सांगतो “मी आयुष्याला कंटाळलो आहे” त्यांनी आयुष्य काय हे 
बघीतले सुद्धा नाही आणि ते आयुष्याला कंटाळले आहेत !! याचा अर्थ 
ते निरोगी असणार नाहीत, पुढच्या ५-६ वर्षात ते विविध आजारांनी 
ग्रासले जातील.
छिन्नमानसिकता (मनोभंजन, स्कीझोफेनिया) हा अजून एक आजार 
विद्यार्थ्यांना भेडसावत आहे. अतिशय हुशार विद्यार्थी तणाव नीट 
हाताळू शकत नाहीत त्यामुळे द्विधृवीय (स्कीझोफेनिया) ची शिकार 
होतात.
माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, २५-३० वर्षापूर्वी तुम्ही स्कीझोफेनिया 
बद्दल ऐकले होते का? ( श्रोते “नाही” म्हणतात)
आज छोट्या किंवा मोठ्या शहरात आपण या आजराबद्दल ऐकतो. 
आपल्याला आपल्या जीवनशैलीकडे लक्ष देऊन सामाजिक आरोग्याकडे 
लक्ष द्यावे लागेल. आपल्याला सगळ्यांना हे माहित आहे की तणाव 
हाच या सगळ्याचे कारण आहे.  तणाव म्हणजे काय? एक व्याख्या 
अशी देता येईल कि तुम्हाला बरेच काही करायचे आहे आणि त्या साठी 
वेळ आणि शक्ती कमी पडत आहे. यानेच तणाव तयार होतो. आज 
तुमचे काम कमी करणे व्यावहारिक नाही. वेळ आहे तेवढाच आहे, तो 
तुम्ही वाढवू शकत नाही. त्यामुळे तुमची शक्ती, उर्जा वाढवणे हाच 
पर्याय आहे. ही उर्जा वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. 
१. अन्न: सकस अन्न खाणे. आपण दक्षिण आशियाई देशात सकस, 
  पोषक आहार करत नाही. आपण फक्त कार्बादके ( कार्बोहायड्रेट्स) खातो. 
  आपला आहार परिपूर्ण नाही. आपण ज्या भाज्या खातो त्यात बटाटे, 
  टोमाटो, वांगी आणि कांदे अधिक प्रमाणात असतात. बटाटे, चपात्या, 
  डाळ हे पिष्टमय पदार्थ आहेत. हा असंतुलित आहार आहे. आपण रोज 
  पोषक आहार घेत नाही. आपल्याला पोषक आणि सकस आहाराबद्दल 
  जागरुकता आणावी लागेल. 
२. चांगली झोप: झोप सुद्धा तुम्हाला उर्जा देते. औषधोपचारांपेक्षा झोप 
  जास्त महत्वाची आहे. मी औषधांचे महत्व कमी करत नाही, पण 
  तुम्ही एखाद्याला औषधे दिली पण त्याला झोपू दिले नाही तर औषधे 
  काम करणार नाहीत. त्यामुळे झोप अतंत्य महत्वाची आहे. निद्रानाश ही 
  आजची मोठी समस्या आहे, आणि पुरेशी झोप नसणे ही सुद्धा गंभीर 
  समस्या आहे. लोक नीट झोपू शकत नाहीत. वाईट स्वप्न पडणे हा 
  नेहेमीचा प्रकार झाला आहे. योग मध्ये औषधाविना आणि झोपेच्या 
  गोळ्याविना चांगली झोप लागण्याचे विविध प्रकार आहेत. काही आसने 
  आणि ध्यान यामार्गे चांगली झोप लागू शकते. हे मार्ग अवलंबल्याने 
  फायदा होईल. 
३. आरोग्यविषयक: आरोग्याच्या दृष्टीने ठेवणाऱ्या स्वच्छतेबाबत सर्व 
  दक्षिण आशियायी देश मागे आहेत. आपल्याला याबाबत जागरुकता आणावी 
  लागेल. आर्ट ऑफ लिविंगच्या 5H (Health, Hygiene, Homes for 
  people, Harmony in diversity and Human Values) कार्यक्रमाद्वारे 
  आम्ही हेच करत आहोत. आपल्या सगळ्याची जीवनशैली वेगवेगळी आहे. 
  केवळ भारतातच ६०० पोटभाषा आहेत, वेगवेगळे धर्म आहेत त्यामुळे 
  सगळ्यांनी एकत्र गुण्यागोविंदाने नांदणे महत्वाचे आहे. 5H कार्यक्रमातून 
  आपण हेच साध्य करतो.
  आपल्या सभोवतालच्या परिसराकडे लक्ष देऊन रोगराई पासून कसा बचाव 
  करता येईल हे पाहिले पाहिजे. बरेच लोक थंडीत दारे उघडतच नाहीत 
  त्यामुळे घरातील हवा कोंदट राहते. बऱ्याच घरात हवा खेळती राहत 
  नाही. मी एका सुप्रसिद्ध कर्करोग विशेषज्ञा कडून ऐकले कि कर्करोग 
  होण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे लोक नीट श्वास घेत नाहीत. 
  जेंव्हा तुम्ही पुरेसा ऑक्शिजन आत घेता, तेंव्हा तुमच्या शरीरातून 
  विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात आणि रोगनिवारण होऊ शकते. 
  दीर्घ श्वास घेण्याने नक्कीच कर्करोग होण्यापसून वाचता येऊ शकते. 
  मी असे शेकडो लोक बघितले आहेत ज्यांनी प्राणायाम, ध्यान, योग 
  आणि थोडे आहारातील बदल याने कर्करोगावर मात केली आहे. लोकांना 
  रसायन उपचारपद्धती (केमोथेरपी) करायची गरज पडली नाही कारण 
  त्यांच्या शरीराने योग्य प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. 
४. श्वास हा उर्जाचा आजून एक स्त्रोत आहे. शुद्ध आणि स्वच्छ हवा 
  जरुरी आहे. बरेचदा मोठ्या शहरातून जेंव्हा आपण चालतो तेंव्हा 
  फक्त पेट्रोलचा धुरच नाही तर विद्युतचुंबकीय लहरींमुळे सुद्धा शरीरावर 
  परिणाम होतो. तसेच तुम्ही ८-९ तास टेलीव्हिजन पहिला तर 
  नक्कीच त्रास होईल. अमेरिकेत जेंव्हा पालकांना काम असते तेंव्हा 
  ते मुलांना तासंनतास टेलीव्हिजन समोर सोडतात. ३-४ वर्षाची 
  मुले तासंनतास टेलीव्हिजन पाहतात. इतके छाप त्यांचा मेंदूवर 
  पडून त्यांच्या मेंदूचे काय होत असेल? याचा परिणाम म्हणजे त्यांच्यात 
  एकाग्रतेचा अभाव येतो. आपल्याला आपल्या जीवनशैलीकडे लक्ष देऊन 
  समाजाच्या आरोग्याकडे आणि त्यांना तणावातून कसे मुक्त करता येईल 
  हे पाहिले पाहिजे. आपल्याला मिळालेल्या देहरूपी देणगीबद्दल आपण 
  कृतज्ञ असले पाहिजे. आपण शरीर आणि मन दोन्हीचा आदर 
  केला पाहिजे.
  जर तुम्ही सर्व नकारात्मक भावना कोंडून ठेवल्या तर ते कर्करोगाला 
  निमंत्रणच ठरेल. तुम्ही राग, इर्षा, लालच, या भावना व्यक्त न करता 
  कोंडून ठेवता कामा नये. इथे योग, प्राणायाम यासारख्या गोष्टी 
  फायदेशीर ठरतील.
  आयुष्याकडे एका विशाल दृष्टीकोनातून पहिले तर राग, द्वेष या गोष्टी 
  आपोआप निघून जातील. तुम्हाला कशा बद्दल इर्षा वाटते? जगात 
  ७०० करोड लोक आहेत, आणि प्रत्येकाला समान संधी आहे. 
  जेंव्हा तुम्ही ज्ञानचक्षु मधून जीवनाकडे पाहता तेंव्हा या नकारात्मक 
  भावना गळून पडतात आणि अंतरंगातून हास्य उमटते. 
  आर्ट ऑफ लिविंगचा ऊदेश्य प्रत्येक चेहेऱ्यावर हास्य आणणे हाच 
  आहे. तुमच्या स्वतःच्या विश्वातून बाहेर येऊन जगाकडे एका 
  वेगळ्या दृष्टीकोनातून पहिले तर आयुष्यात बदल घडेल. जेंव्हा 
  छोटी किंवा तुम्ही ज्याला मोठी समस्या मानता त्यात अडकून पडता. 
  जागे व्हा आणि बघा जगात लोकांना कितीतरी मोठ्या समस्या आहेत. 
  त्यांना तुमची गरज आहे आणि तुम्ही त्यांना मदत करू शकता. 
  ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदतीचा हात द्यायला पुढे व्हा. 
  जेव्हा तुम्ही असे कराल तेंव्हा तुमची समस्या तुम्हाला वाटली तेव्हडी मोठी 
  नसून एकदम छोटी वाटेल. जेंव्हा तुमच्या लक्ष्यात येईल कि 
  तुमची समस्या छोटी आहे त्याच क्षणी तुम्हाला उर्जा मिळेल आणि 
  तुम्ही पुढे चालायला लागाल. 
  मनाला थोड्या शिकवणीची गरज आहे. काही तासात आम्ही 
  लोकांना थोडे निर्देशन करून, काही छोट्या सूचना देऊन त्यांना 
  आपल्या मनावर, भावनांवर नियंत्रण कसे मिळवता येईल हे शिकवतो. 
  आपण कोणाची जीवनशैली बदलू शकत नाही, ती त्यांची त्यांनाच 
  बदलावी लागेल. एक डॉक्टर म्हणून तुम्ही रोग्याच्या औषधाची 
  काळजी घेऊ शकाल, पण ती औषधे घेण्याची जबाबदारी त्यालाच 
  घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना तणाव दूर करायचे मार्ग 
  सुचवू शकाल. लोकांना मदत करण्यासाठी पुढचे पाउल टाका. 

मुल्ला नसरुदिनची एक गोष्ट आहे. एकदा मुल्लाला बरीच हाडे 
मोडल्यामुळे बॅन्डेज बांधून इस्पितळात दाखल केले, मुल्लाला त्याच्या 
मित्राने येऊन विचारले ‘मुल्ला कसा आहेस?’ मुल्ला म्हाणाला 
‘ठीक आहे फक्त मी हसलो कि खूप दुखते आहे’ त्याच्या मित्राने 
विचारले ‘ या अवस्थेत तू कसा हसू शकतोस?’ मुल्ला म्हणाला 
‘मी आता हसू शकलो नाही तर मी माझ्या आयुष्यात कधीही हसलो 
नाही असा होईल’ याला ज्ञान म्हणतात, प्रत्येक परिस्थितीत हास्य 
कायम ठेवणे. आयुष्याकडे संघर्ष म्हणून न पाहता एक आव्हान 
म्हणून पहा. आयुष्य ही पिडा नसून अनेकविध भावनांचा समूह 
म्हणून पहा. यालाच मी ज्ञान असे म्हणेन. 
आपल्याकडे हे ज्ञान शेकडो वर्षापासून चालत आले आहे, पण ते 
काही मर्यादित लोकांसाठी होते. त्यांनी ते त्यांच्यासाठी वापरले आणि 
त्यांच्या वारसांकडे दिले पण संपूर्ण समाजाला दिले नाही. मला वाटते 
ते ज्ञान सगळ्यांना मिळण्याची हीच योग्य वेळ आहे. ही सगळी
विद्या लोकांना त्यांचे आयुष्य चांगले आणि निरोगी जगायला मदत 
करेल.