याचे उत्तर आहे : प्रेम

13
2014
Nov
बंगळूरू, भारत.

प्रश्न: गुरुदेव, आसक्तीपासून कशी सुटका करून घ्यावी ?

श्री श्री : तुम्हाला आसक्तीपासून का सुटका हवी आहे? कारण ती तुम्हाला 
वेदना देते म्हणून? जर ती तुम्हाला वेदना देत नसती तर तुम्ही तिच्यापासून 
सुटका करून घ्यायचा विचार केला नसता. आसक्ती तुम्हाला वेदना देते 
कारण त्याच्याबाबत काही अज्ञान आहे. आसक्तीपासून दूर जायचा प्रयत्न 
करू नका. मी असे म्हणेन कि, तुम्ही केंद्रित व्हायला शिका. जीवन तसेच 
ही निर्मिती याबद्धलची तुमची समज वाढवा. मग तुमच्या असे लक्षात येईल 
कि आसक्तीपासून सुटका करून घ्यायची तुम्हाला गरज नाही. ती आपसूक 
नाहीशी होईल.

तुमच्यापैकी किती जणांना या आधीच असा अनुभव आला आहे की तुमची 
आसक्ती आपोआप गळून गेली आहे ? त्यांनी हात वरती करा. 

(अनेक श्रोते हात वरती करतात).

लहान मुलांना साखरेच्या कापसाबद्धल खूप आसक्ती असते. तुम्ही 
त्यांच्यासमोर कोणताही गोड पदार्थ ठेवायचा अवकाश की ते तो ताबडतोब 
फस्त करतात. पण ते जसे मोठे होतात तसे त्यांचा गोड पदार्थ आणि 
खेळणी यांचा हव्यास आपोआप कमी होतो. त्यासाठी त्यांना काही विशेष 
कष्ट घ्यावे लागत नाहीत.

अनासक्ती हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

जसे तुम्ही परिपक्व होत जाता, जसा तुमचा विकास व्हायला लागतो, 
तसे तुम्ही आयुष्यातील अशा छोट्या छोट्या गोष्टीत अडकून आणि 
गुंतून राहणे हे आपोआप थांबते.

नाहीतर, पूर्वी तुमचा कोणी अपमान केला किंवा वाईट वागणूक दिली तर 
तुम्हाला त्याचे खूप वाईट वाटायचे आणि तुम्ही मग अनेक दिवस मनात 
ती गोष्ट ठेवत असायचे, काही वेळा तर अनेक महिने ते तुमच्या लक्षात 
राहायचे. तुम्हाला असे वाटायचे कि ‘ त्याने मला कशी वागणूक दिली हे 
मी कधीच विसरणार नाही.’ असा विचार करून तुम्ही स्वतःला का शिक्षा 
देत आहात? असे आपण नेहमी आणि अनेक वेळा करतो, आणि असा 
असंतोष मनात ठेवल्यावर आपल्याला अभिमान वाटत असे. पण असे 
करणे हा एक मुर्खपणा आहे. 

तुम्ही अवलोकन करून असा स्वीकार केला पाहिजे कि विविध लोकांच्या 
बोलण्याच्या विविध तऱ्हा असतात, त्यांची वागणूक वेगळी असते, अनेक 
गोष्टी करण्याचा आणि स्वतःला व्यक्त करण्याचा त्यांचा दृष्टीकोन वेगळा 
असतो. त्यांच्या हृदयात प्रेम नसते म्हणून ते असे करतात असा विचार 
करू नका. ते तसे नसते. कदाचित तुम्हाला ते योग्य तऱ्हेने दिसत नसेल 
किंवा त्यांना ते योग्य तऱ्हेने प्रस्तुत करता येत नसेल.
या सगळ्याकडे तुम्ही दुसऱ्याच्या दृष्टीकोनातून बघा. सासू-सुना कितीही 
भांडल्या तरी शेवटी ते भांडण संपते. म्हणून या सर्व गोष्टी व्यापक 
दृष्टीकोनातून बघा.

काही आठवड्यापूर्वी एक तरुण मुलगी तिच्या काही कौटुंबिक समस्याबाबत 
माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी माझ्याकडे आली होती. ती मला म्हणाली 
कि, ‘गुरुदेव, माझ्या सासूबाई फार कठोर आहेत आणि त्या सारख्या मला 
रागवत असतात’.

मी तिला विचारले कि असे का आहे.

त्यावर ती म्हणाली , ‘ त्या तश्या का वागतात हे मला माहित नाही. 
पण त्या माझ्या प्रत्येक कामात चूक काढीत असतात’.

ते ऐकल्यावर मी तिला म्हणालो, ‘ मला एक सांग, तुझी आई तुझ्याशी 
अशी वागत नव्हती का?’
त्यावर ती म्हणाली,’ होय गुरुदेव, ती पण माझ्याशी अशीच वागत असे. 
कोणत्याही छोट्या कारणावरून आमच्यात सतत भांडणे होत असत.’

आता जेंव्हा तुम्ही तुमच्या आईशी भांडता तेंव्हा ते मनाला लाऊन घेत नाही. 
एखादे वेळी कितीही भांडण झाले असले तरी दुसऱ्या दिवशी तुम्ही परत 
तिच्याशी प्रेमाने आणि नेहमीसारखे वागत होता, होय कि नाही? आता 
तुमची आई आणि तुमच्या सासूबाई या दोघी एकाच पिढीतील आणि 
साधारणपणे एकाच वयाच्या असतील. मग सासूबाई जर तुम्हाला काही 
म्हणाल्या तर ते तुम्ही एवढे मनाला का लाऊन घेता?

मग ती मुलगी म्हणाली,’ गुरुदेव, मी असा विचार कधीच केला नव्हता’.

म्हणून तुमच्या विचार-सारणीत थोडा बदल करा.या छोट्या गोष्टी सोडून 
देऊन आयुष्यात पुढे चालत रहा. 
अशा छोट्या छोट्या गोष्टी अडकून राहून, ‘ अरे, ती मला असे म्हणाली, 
तिने मला योग्य वागणूक दिली नाही’ असे म्हणण्याचा काय उपयोग आहे.

जेंव्हा तुम्हाला कोणी असे काही हानिकारक बोलेल किंवा अपमानास्पद 
वागणूक देईल तेंव्हा असे लक्षात घ्या कि ते त्यांचा तणाव किंवा त्यांचे 
अज्ञान यामुळे तसे करीत आहेत. ते आतून अपमानित असतात म्हणून 
ते असे वागतात. त्यांच्या मनातल्या जखमांसाठी तुम्ही का स्वतःला का 
त्रास करून घेताय? तुम्ही मन मोठे करून याकडे व्यापक दृष्टीकोनातून 
पाहिले पाहिजे.

तुम्हाला माहित आहे का, तुम्ही प्रेमाने प्रत्येकाला आणि प्रत्येक परिस्थितीला 
जिंकू शकता. प्रेमाने जिंकू शकत नाही असे या जगात आणि आयुष्यात 
काहीहि नाही.

आता हेच पुढे ताणून मला असे विचारू नका कि, ‘ गुरुदेव, आपण 
या पद्धतीने तालिबानवर विजय मिळवू शकू का?’
त्यासाठी आपल्याला साम (वास्तविक अनुनय), दम (लालच), भेद 
(धमकी), दंड (शिक्षा) याचा उपयोग करायला पाहिजे. पण आपल्या 
घरात या निष्कारण वादात पडून स्वतःला त्रास करून घ्यायची काय गरज 
आहे? तुमच्या सासूशी वैर ठेऊन तुम्ही काय मिळवू इच्छिता? कमीतकमी 
तुम्ही स्वतः प्रथम एक व्यापक दृष्टीकोन ठेऊन या सगळ्याकडे बघायला 
शिका.

माझा सल्ला ऐकल्यानंतर त्या दोन्ही स्त्रिया आता एकमेकींशी प्रेमाने वागत 
आहेत. जणू काही घडलेच नाही अशा तऱ्हेने तो प्रश्न आता सुटला आहे. 
ती सून घर सोडून दुसरीकडे राहायला जाणार होती, पण आता ते कुटुंब 
या समस्येपासून दूर गेले आहे.

ही काही एका विशिष्ट घरातील गोष्ट नाही. आपल्या संपूर्ण देशभर अशी 
अनेक हजारो कुटुंबे आहेत की जेथे हा प्रश्न आहे. हा प्रश्न प्रामुख्याने 
आशिया आणि भारतासारख्या देशात आढळून येतो.

आपण आपले मन कसे नियंत्रित करतो यावर हे अवलंबून आहे. म्हणून 
आपण नियमित साधना केली पाहिजे. आपण काही क्षणापुरते का होईना 
आपले मन शांत करून विश्राम कसा घेता येईल हे पाहिले पाहिजे. मी 
तुम्हाला सांगतो कि, आपण जर आपली दृष्टी थोडीशी विस्तारित केली 
तर आपण आपल्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडवून आणू शकू. 
यामुळे आपण तर आनंदी होऊच पण त्याबरोबर आपल्या आजूबाजूच्या 
लोकांमध्ये पण बदल घडवून आणू शकतो.
साधारणपणे आपण छोट्या छोट्या गोष्टीत अडकून बसतो आणि मग 
आपल्याला आणि आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना दुखः होते. हे 
अज्ञान आहे. हे समजण्यासाठी तुम्ही काही फार मोठे पंडित असायचे 
आवश्यकता नाही किंवा पोथ्या पुराणे वाचायची पण गरज नाही. फक्त 
रोज काही वेळ ध्यान करा आणि ज्ञान ऐकत रहा. जे ज्ञान ऐकले आहे 
ते मनावर बिंबवून आयुष्यात उपयोगात आणा.

प्रश्न: गुरुदेव, नेपाळमध्ये भगवान शंकरांची ‘पशुपतीनाथ’ म्हणून 
पूजा केली जाते. पशुपती याचा अर्थ काय?

श्री श्री: पशु ( प्राण्यांसाठी हिंदी शब्द) म्हणजे ज्याला कशाने 
तरी बांधून ठेवले आहे किंवा जो कोणी गुलामीत अडकला आहे. पाश 
म्हणजे दोरासारखा असतो, जो तुम्हाला कशाला तरी बांधून ठेवतो किंवा 
तुमच्या हालचालींवर बंधन आणतो तो. असे आठ प्रकारचे पाश आहेत 
आणि म्हणून आठ प्रकारचे पशु त्यांनी बांधून ठेवले आहेत.

इंग्रजीत अशी एक म्हण आहे कि “ माणूस हा सामाजिक प्राणी आहे.’ 
म्हणून या जगात प्रत्येकजण हा कोणत्या न कोणत्या तरी बंधनात 
अडकला आहे जसे कि लालसा, आसक्ती वगैरे. ही सृष्टी जी  आठ 
प्रकारच्या बंधनांनी बांधली आहे, तिचे भगवान शंकर हे स्वामी आहेत. 
म्हणून ते या जगातील सर्व सजीव जीव वस्तूचे स्वामी आणि भगवान 
आहेत.
नेपाळमध्ये प्राणी बळी द्यायची एक जुनी रूढी आहे. तुम्ही जाऊन देवळात 
कोणताही बळी देऊ नका. भगवान शंकरांना ते अजिबात आवडत नाही. 
तुम्हा सर्वांना हे माहित आहे काय? देवाला खुश करण्यासाठी दुसऱ्या 
जीवाचा बळी देणे हे खूप मोठे पाप आहे. असे करणे म्हणजे मोठे 
अज्ञान आहे.

आज मी आपल्या आर्ट ऑफ लिविंगच्या सर्व शिक्षकांचे आणि स्वयं-सेवकांचे, 
त्यांनी प्राणीबळी आणि प्राणीहत्या संपविण्यासाठी केलेल्या कठोर परीश्रमांसाठी 
अभिनंदन करतो. मला असे सांगण्यात आले आहे कि प्राणीबळी हे ४०% किंवा 
६०% कमी झाले आहेत. याबद्धल तुम्ही नेहमी लोकांना जागरूक केले पाहिजे 
आणि या दृष्टीने जास्तीत जास्त लोकांना शिकविले पाहिजे. त्यांना असे सांगा 
कि दुसरा एखादा जीव ते या जगात ते आणू शकत नाहीत त्याचप्रमाणे 
ते कोणाचा जीव घेऊ शकत नाही. तुम्ही जर एखाद्या निष्पाप बकऱ्याला 
जन्म देऊन जीवन देऊ शकत असाल तरच तुम्हाला त्याचा जीव घ्यायचा 
हक्क आहे. पण जेंव्हा त्या बकऱ्याला जन्माला घालायची ताकद जर 
तुमच्यात नसेल तर तुम्ही त्याला मारू पण शकत नाही. या पृथ्वीवरील 
प्रत्येक जीवाला जगण्याचा हक्क आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी कोणाचा 
बळी द्यावा असे आपल्या कोठल्याही पुराणात लिहिलेले नाही.